Spread the love

‘बसपा’चा निळा झेंडा यंदा विधानसभेत झळकणार-डॉ.हुलगेश चलवादी
शोषित,पीडित, उपेक्षितांना यंदा कायदेमंडळात नेतृत्व मिळेल

पुणे, : समाजातील शोषित, पीडित, उपेक्षितांना नेतृत्व देवून त्यांना शासनकर्ती जमात करण्याचे महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मान्यवर कांशीराम साहेब आयुष्यभर झटले. बहुजन समाज पक्षाने तळागाळातील समाजाला नेतृत्व देत उत्तर प्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्ता मिळवली. आता महाराष्ट्रातही उपेक्षित वर्गाचा राजकीय प्रतिनिधी बसपाच्या माध्यमातून कायदेमंडळात पोहचेल,असा विश्वास बसपचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र प्रभारी, वडगाव शेरी मतदार संघाचे उमेदवार डॉ.हुलगेश चलवादी यांनी बुधवारी (ता.६) व्यक्त केला.

देशाच्या आयरन लेडी, उत्तर प्रदेशचे कणखर नेतृत्व, यशस्वी माजी मुख्यमंत्री माननीय सुश्री बहन मायावती जी येत्या १७ नोव्हेंबर रोजी पुण्यातील येरवडा येथे महासभेला संबोधित करणार आहेत. दुपारी १२ वाजता येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालय मैदान, कॉमर झोन येथे आयोजित या सभेसाठी समाजातील अनेक बुद्धिवंत, विचारवंत आणि समाजसेवकांना आमंत्रित करण्यात आले आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले. राज्यात गेल्या काही वर्षात मराठा आरक्षणाचे आंदोलन बरेच गाजले.उपेक्षितांना विकासाच्या पुढील पंगतीत आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. बसपाचे आरक्षणाला समर्थन आहे.राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर बसपा योग्य मार्ग काढू शकतो. अशात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची नुकतीच भेट घेत त्यांना देखील मा.बहनजींच्या सभेचे निमंत्रण देण्यात आल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

पुणेरी पगडी आणि संविधानाची प्रत यावेळी बसपच्या शिष्टमंडळाकडून जरांगे यांना देण्यात आली.यावेळी बसपाचे प्रदेश सचिव सुदीप गायकवाड आणि स्वप्नील शिर्के प्रामुख्याने उपस्थित होते.जरांगेची मराठा आरक्षण आंदोलनातील भूमिका प्रेरणादायी आहे.सर्व समाजाने एकत्रित येवून यशस्वी नवीन राजकीय समीकरणे जुळवून आणता येईल,अशी भावना डॉ.चलवादी यांनी या भेटीनंतर व्यक्त केली.वडगाव शेरी मतदार संघात पक्षाचा कॅडर घरोघरी जावून मतदारांना बसपाची भूमिका आणि विचार समजावून सांगत आहे. मतदारांना येणाऱ्या काळात पक्षाकडून केल्या जाणाऱ्या विकासकामांची ‘गॅरंटी’दिली जात असल्याचे देखील डॉ.चलवादी म्हणाले.