
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांची घोषणा
संविधान जगण्याची चौकट आणि समानतेचं प्रतीक
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील
मुंबई, दि. २०, मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर स्थापन केली जाणार असून या चेअरसाठी प्राध्यापक आणि संशोधक पदांना मान्यता दिली जाणार आहे. तसेच कलिना संकुलात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दोन वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज मुंबई विद्यापीठात केली. मुंबई विद्यापीठात आयोजित संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमात ते उपस्थितांशी संवाद साधत होते. मुंबई विद्यापीठात नव्याने स्थापन होणारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र माता रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र आणि श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव अमित यादव, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, प्रा. मनिषा करणे, अनिल कुमार पाटील, प्रभात कुमार सिंह यांच्यासह विविध मान्यवर आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, भारतीय संविधान हा एक जिवंत दस्तऐवज असून तो वाचून समजणे महत्वाचे आहे. आपल्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव संविधानामुळे होत असून सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक जीवन जगण्याचा मार्ग संविधानामुळे मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. संविधान अमृत महोत्सव हा अत्यंत स्तूत्य उपक्रम असून मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
संविधान जगण्याची चौकट आणि समानतेचं प्रतीक
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्याचे मोठे अमुल्य कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असल्याचे सांगितले. संविधान ही जीवन जगण्याची चौकट आहे. भारतीय संविधान बदलले जात असल्याचा चुकीचा प्रचार केला जात असून संविधान बदलले जात नाही तर वेळ प्रसंगी त्यामध्ये सुधारणा केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत १०६ वेळा घटनादुरुस्त्या करण्यात आल्या. महिलांना विधानसभा व लोकसभेत ३३ टक्के आरक्षण, सर्वाना मोफत शिक्षण आणि ज्या विद्यार्थ्यांना जातीचे कोणतेच आरक्षण मिळत नाही आणि आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा विद्यार्थ्यांना आर्थिक निकषांवर नोकरीत १० टक्के आरक्षण देण्यासाठी सामाजिक दृष्टीने हितासाठी वेळप्रसंगी बदल करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना मतदानाचा समान अधिकार दिला त्याबद्दल आपण त्याचे ऋण व्यक्त केले पाहिजे असेही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर, दोन वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जाहीर केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांचे आभार मानले. विद्यापीठामार्फत लवकरच या अनुषंगाने प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे सांगून भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांत विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव अमित यादव यांनी आपल्या उदबोधनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर प्रकाश टाकला.