Spread the love

पुणे, : विधानसभा निवडणूक शांततेत, पारदर्शक आणि व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासनाची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलातून आज मतदान साहित्य मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आले. त्यावेळी श्री. दौंडे बोलत होते. ते म्हणाले, खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार ३ लाख ७६ हजार ६२३ मतदार आहेत. त्यापैकी पुरुष मतदार १ लाख ९३ हजार ७१९ (५१. ४४ टक्के), महिला मतदार १ लाख ८२ हजार ८९२ (४८.५६ टक्के) आणि तृतीयपंथी मतदार १२ आहेत. यामध्ये ३ हजार ६३० दिव्यांग मतदार असून त्यापैकी ४५ तसेच ८५ वर्षांपेक्षा ५ हजार ३१० ज्येष्ठ नागरिकांपैकी ७५ मतदारांना गृहमतदान सुविधेचा लाभ देण्यात आला.

राजगुरूनगर येथील महात्मा गांधी विद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक १५१ येथे पिंक मतदान केंद्र, धुओली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्र क्रमांक ६ येथे युनिक मतदान केंद्र, होलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक २०७ येथे दिव्यांग मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. चाकण येथील मुलींची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक २८९ येथे युवा व्यवस्थापित मतदान केंद्र, वाकी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्र क्रमांक २३० येथे मॉडेल मतदान केंद्र, राजगुरूनगर येथील मुलींची जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्र क्रमांक २३९ येथे पर्दानशीन मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. खेडमध्ये एकही संवेदनशील व प्रादेशिक मतदान केंद्र नाही.

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात ३८९ मतदान केंद्र असून यापैकी १९५ मतदान केंद्रावर मतदान सुरु असेपर्यंत वेब कॅमेऱ्याच्या सहाय्याने देखरेख ठेवण्यात येणार आहे. ६५ एस.टी. बसेस, ४ जीपच्या सहाय्याने राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलातून १ हजार ८८८ अधिकारी व कर्मचारी, ईव्हीएम, व्ही.व्ही.पॅड, आणि इतर साहित्य रवाना करण्यात आले. साहित्य वाटपासाठी ३६ ठिकाणी टेबल लावण्यात आले होते. सर्व मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक पथकासोबत पोलीस कमांडो देण्यात आले आहेत, असे श्री. दौंडे म्हणाले.

मतदान केंद्रावरील प्रत्येक दोन तासाला झालेल्या मतदानाची आकडेवारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मार्फत उपलब्ध होणार आहे, अशी माहितीही श्री. दौंडे यांनी दिली.