
जागतिक पातळीवरील विद्यार्थी, संशोधक, डॉक्टर व व्यावसायिक यांना मिळणार एकत्र येण्याचे व्यासपीठ
पुणे : भारताच्या प्राचीन परंपरेतील आयुर्वेद व योग शास्त्र हे जगभरात आज वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल राखण्यावर आधारित असलेल्या या विज्ञानामुळे आधुनिक जीवनशैलीशी निगडित आजारांवर (मधुमेह, स्थूलता, उच्च रक्तदाब, मानसिक ताण इ.) नैसर्गिक व प्रभावी उपाय मिळत आहेत. याच कारणामुळे आयुर्वेद व योग आता केवळ उपचार पद्धती न राहता समग्र जीवनशैलीचे विज्ञान म्हणून जगभरात मान्यता मिळवत आहे.
या पार्श्वभूमीवर सिफा (Shiv International Fraternity of Ayurved ) या आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत संस्थेतर्फे, स्वान फाउंडेशन आणि शिव आयुर्वेद, सिंगापूर यांच्या सहकार्याने दुसरी आंतरराष्ट्रीय आयुरहेल्थ परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद १ व २ नोव्हेंबर २०२५ रोजी व्हिएतनाममधिल हो-चि-मिन्ह सिटी येथे होणार असून, या महत्त्वपूर्ण परिषदेसाठी आयुष विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक तसेच Indian Embassy ( व्हिएतनाम) यांचे सहकार्य लाभले आहे.
या परिषदेची माहिती देताना सिफाच्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिल्पा स्वार ( केसरकर) म्हणाल्या , “आयुर्वेद व योग क्षेत्रातील विद्यार्थी, संशोधक, डॉक्टर, उद्योगपती आणि जागतिक संस्था यांना एकत्र आणणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. जागतिक पातळीवर आयुर्वेद व योगाचा प्रसार व प्रचार करणे , भारतातील आयुर्वेद, योग तज्ज्ञांना आंतरराष्ट्रीय platform उपलब्ध करून देणे हा सिफा व शिव आयुर्वेद या संस्थांचा मुख्य उद्देश आहे. पहिली परिषद २०२३ मध्ये सिंगापूर येथे झाली होती, ज्यात ८ देशांमधून १०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यंदा व्हिएतनाममध्ये परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे कारण दक्षिण आशियाई देश आयुर्वेदासाठी वेगाने उदयास येणारे ‘एमर्जिंग हब’ बनत आहेत. यामुळे भारतीय व्यावसायिक व विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर संधी उपलब्ध होणार आहेत.”
डॅा. शिल्पा स्वार(केसरकर ) व डॅा. ज्योती मुंडर्गी ( सिफा सदस्य) यांनी परिषदेमध्ये जास्तीत जास्त प्रतिनिधींनी सहभागी व्हावे व या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मीडियाद्वारे
केले.
सेशेल या देशात लाइफ कोच म्हणून कार्यरत असलेल्या श्रुती आर्या यांनी जागतिक स्तरावर वेलनेस आणि योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, ” जगभरात विविध ठिकाणी वेलनेस आणि योग याबाबत अनेक संधी उपलब्ध आहेत. एकट्या युएस देशात तब्बल ५०,००० हून अधिक वेलनेस आणि योग केंद्र सुरु आहेत. याशिवाय तुर्की, दुबई, आयर्लंड, न्यूझीलंड अशा अनेक देशांमध्ये या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून, त्या वाढतच आहेत. त्यामुळे भारतातील लोकांनी या संधीची माहिती घेऊन, त्याचा लाभ घेतला पाहिजे.
स्वान फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले , “ही परिषद आयुर्वेद व योगाच्या जागतिकीकरणासाठी महत्वाची ठरेल. व्हिएतनाम आणि इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये सध्या आयुर्वेदासाठी मोठी बाजारपेठ निर्माण होत आहे. यामुळे भारतातील तज्ज्ञांना नव्या संधींचा लाभ घेता येईल.”
या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. तनुजा नेसरी, संचालक, इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग अँड रिसर्च इन आयुर्वेद, जामनगर ; डॉ. मिलिंद निकुंभ, प्र-कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक; डॉ. नारायण जाधव, अध्यक्ष, मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्ड ( NCISM) नवी दिल्ली; डॉ. अस्मिता जगताप कार्यकारी संचालक, भारती हॉस्पिटल, डॉ. जयंत खंदारे, ऑन्कोलॉजिस्ट, डॉ. मनीष परदेशी, हेड स्पोर्टस फ़िजिओथेरपिस्ट, एमिरेट्स क्रिकेट बोर्ड हे मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
परिषदेतील ठळक मुद्दे :
– परिषदेचे उद्घाटन डॅा विप्रा पांडे ( Consul General, व्हिएतनाम भारतीय दूतावास) यांच्या हस्ते श्री रिचेन चापेल ( जिन्हिवा) यांच्या उपस्थितीत होणार
– आंतरराष्ट्रीय योग स्पर्धा: विविध देशांतील योग स्पर्धकांचा सहभाग
– जगभरातील किमान ८ देशांतील तज्ज्ञ व प्रतिनिधींचा सहभाग व विविध आजारांवरील आरोग्य विषयक मार्गदर्शन
– विद्यार्थी, संशोधक व डॉक्टर यांना संशोधन निबंध सादर करण्याची संधी, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुस्तक प्रकाशनाची संधी
– आयुर्वेद क्षेत्रातील उत्पादनांचे, उपकरणांचे आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन
– नवीन व्यावसायिक संधी व सहकार्याचे मार्ग शोधण्यासाठी विशेष सत्रे
– उत्कृष्ट योगदान व सादरीकरणासाठी विशेष सिफा गौरव पुरस्कार
– आयुर्वेद क्षेत्रातील जागतिक स्तरावरील नवीन धोरणे, शैक्षणिक व औद्योगिक संधी यावर सविस्तर चर्चासत्रे