
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (NIA) न्यायालयाने आज सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्यामुळे अखेर ‘हिंदु आतंकवाद’ वा ‘भगवा दहशतवाद’ या नावाने रचलेले घृणास्पद काँग्रेसी षड्यंत्र उघडे पडले आहे. केवळ हिंदू असल्यामुळे राष्ट्रनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि अजय राहिरकर यांच्यासारख्या अनेक राष्ट्रप्रेमी व्यक्तींना अकारण वर्षानुवर्षे तुरुंगात डांबले. त्यांचा अमानुष मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला. हा केवळ त्यांच्या विरोधातील अन्याय नव्हे, तर संपूर्ण हिंदू समाजाला बदनाम करण्याचा मोठा विखारी कट होता. त्यामुळे ही केस आता बंद करून चालणार नाही; हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे षड्यंत्र रचणार्यांवर कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी मालेगाव बॉबस्फोटप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर केली आहे.
श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की, मालेगाव प्रकरणात ‘हिंदु आतंकवाद’ या शब्दाचा वापर करणारे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नंतर ती चूक असल्याचे जाहीरपणे कबूल केले; पण त्यांनी तो शब्द कोणाच्या सांगण्यावरून वापरला? हिंदूंना बदनाम करण्यामागे कोणाचे षड्यंत्र होते ? त्या सूत्रधारांवरही कारवाई झाली पाहिजे. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी मध्यंतरी ‘या देशात हिंदू दहशतवाद ही पाकिस्तानातील लष्करी इस्लामी आतंकवादापेक्षा मोठी समस्या आहे’ असे विधान अमेरिकेच्या राजदूतासमोर केल्याचे विकिलिक्स केबलने उघड केले होते. हिंदू समाजावर दहशतवादाचा खोटा शिक्का मारणारे, राष्ट्रनिष्ठ व्यक्तींना यात अडकवणारे आणि तपासाच्या नावाखाली अन्याय करणारे सगळे दोषी शोधून त्यांना कठोर शिक्षा देणे हाच न्याय आहे!