पुणे, दि. १३: सिंपल स्टेप्स फिटनेस या संस्थेतर्फे सिंहगड किल्ला येथे १४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी रन इव्हेंट मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी या दोन दिवशी सिंहगडावर जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केली आहे.
रन इवेंट मॅरेथॉन स्पर्धेमध्ये साधारणपणे ४०० धावपटूंसह मार्गदर्शक, स्वयंसेवक व प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी कळविले आहे. त्यामुळे १४ व १५ डिसेंबर २०२४ रोजी सिंहगड घाट रस्ता मार्गात वर्दळ व गर्दी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सिंहगड घाट वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आणि वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
पर्यायी मार्ग:
या दोन दिवशी वाहतुकीला पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे असणार आहे. हवेली पोलीस ठाणे हद्दीतून गोळेवाडी मार्ग घाटरस्ता मार्गे खेड-शिवापुर येथे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून ती डोणजे-खडकवासला-वडगाव धायरी मार्गे नवीन कात्रज बोगदा येथून खेड शिवापूर येथे पर्यायी मार्गाने जाईल. राजगड पोलीस ठाणे हद्दीतून कोंढणपूर येथून घाटरस्ता मार्गे सिंहगड किल्ला- गोळेवाडी येथे येणारा रस्ता पूर्णपणे बंद राहणार असून वाहने डोणजे गावाकडे जाण्याकरीता खेड शिवापूर-शिंदेवाडी-नवीन कात्रज बोगदा या पर्यायी मार्गे वडगाव धायरी येथून खडकवासला डोणजे मार्गे गोळेवाडीकडे जातील.
अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही बंदी लागू राहणार नाही, असेही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या आदेशात नमूद केले आहे.