Spread the love

पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवारी होणार गौरव

पुणे : भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीतर्फे भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवारी संविधान रत्न पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम गुरुवार, दि. 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सहभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि शिवस्पूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. शैलजा मोळक यांना संविधान रत्न पुरस्काराने गौरविले जाणार आहे. पुरस्कार वितरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर असून कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर असणार आहेत. लता राजगुरू, परशुराम वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.