Spread the love

पुणे : भारतीय राज्य घटनेमुळे दलित समाजाला आरक्षण मिळाले. भाजपने राज्य घटनेचा अपमान केला असून लोकांना जाती-धर्मांत विभागण्याचे काम भाजप करीत आहे. महाराष्ट्रातील उद्योग भाजपने गुजरातला पळवले आहेत. लोकशाही, राज्य घटना आणि हे राज्य वाचविण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी जाहीर सभेत केले.
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार दत्ता बहिरट, पर्वती मतदारसंघातील उमेदवार अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ
वानवडी येथील संविधान चौकात आयोजित
सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे यावेळी उपस्थित होते.
भाजपने सत्तेसाठी लोकांमध्ये फूट पाडली. दोन पक्ष फोडले , अशी टीका करून हम लोग जोडने वाले हैं, तोडने वाले नहीं असे खरगे यांनी सांगितले.
खरगे म्हणाले, मोदींनी महाराष्ट्राच्या विकासावर बोलावे. गांधी परिवाराने आपले प्राण गमावले त्या देशाचा मोदी, शहा या जोडीने सत्यनाश केला आहे. काॅग्रेसने विकसित केलेले सगळे हे विकायला निघाले आहेत. महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला पळवले आहेत. दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याची घोषणा करणारे गप्प आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. महागाई वाढली आहे. सीमेवर घुसखोरी सुरू आहे. राम मंदिर आणि संसद भवन गळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. खोके सरकार केवळ खिसे भरण्यात व्यस्त आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेद्वारे देशाला जोडण्याचे काम केले आहे. महाविकास आघाडी नागनागरिकांसाठी विविध योजना राबविणार आहे.
पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीआधी भाजपच्या नेत्यांनी चारसो पारची घोषणा दिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्य घटना बदलण्याचा त्यांचा डाव लपून राहिला नव्हता. मतदारांनी त्या निवडणुकीत भाजपला धडा शिकवला. मात्र, राज्य घटनेसमोरील धोका टळलेला नाही. भाजपने राज्यात दोन पक्ष फोडले. महायुतीचे सरकार लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देत आहे. पण, या राज्यात मुली, महिला असुरक्षित आहेत?. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. हे राज्य वाचवायचे असेल तर महायुतीला सत्तेतून खाली खेचावे लागेल. महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा आल्यास या राज्यातील परिस्थिती दुरुस्त करता येईल. राज्य घटना, लोकशाही आणि महिला सुरक्षा यासाठी नागरिकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे.
यावेळी रमेश बागवे, रवींद्र धंगेकर, अश्विनी कदम यांच्या महाविकास आघाडीतील नेत्यांची भाषणे झाली. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आप तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेमुळे संपूर्ण परिसर महाविकास आघाडीमय झाला होता.