Spread the love

बारामती, दि. १६: बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये ३८६ मतदान केंद्र असून ३ लाख ८१ हजार १५७ इतकी मतदारसंख्या आहे, त्यापैकी १५ नोव्हेंबर अखेर २ लाख ९९ हजार ८६० इतक्या मतदारांना मतदार माहिती चिठ्ठीचे वितरण करण्यात आले. त्याचे प्रमाण ७८ टक्के इतके आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढावी, यादृष्टीने निवडणूक प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता नियोजन करण्यात येत असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरु आहे.

मतदारांना आपल्या केंद्राचे नाव आणि स्थळांची माहिती होऊन मतदान प्रक्रिया सुलभ होण्याकरीता मतदार माहिती चिठ्ठीचे वितरण करण्यात येत आहे. एकूण २४ क्षेत्रीय अधिकारी आणि ३८६ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्यामार्फत मतदार माहिती चिठ्ठीचे वितरण काम सुरू आहे, अशी माहिती श्री. नावडकर यांनी दिली आहे.