पुणे – अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन पुण्यातील आपटे रस्त्यावरील हॉटेल कोहिनूर येथे करण्यात आले होते.अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचा भाजपा-महायुतीला पाठिंबा तसेच विधानसभा निवडणुकीत प्रचारात सक्रिय उतरण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमान सुतार, प्रदेशाध्यक्ष किशोर मासाळ, कार्याध्यक्ष प्रा.नानासाहेब टेंगले , कार्याध्यक्ष युवा आघाडी सचिन शाहीर, सचिव युवा आघाडी भारत भोंग, प्रदेशाध्यक्षा महिला आघाडी रेखा आखाडे, प्रदेशाध्यक्षा सांस्कृतिक आघाडी आकांक्षा कुंभार, प्रसिद्धीप्रमुख कादंबरी वेदपाठक, राज्य कोअर कमिटी सदस्या अर्चना गुरव, ऑल इंडिया गोर बंजारा कलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल राठोड उपस्थित होते.
ओबीसी समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात 52 टक्के असून 2006 पासून ओबीसी समाज संघर्ष करत आहे असे मेळाव्यात बोलताना पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले. इतर पक्षांनाही ओबीसी समाजाबद्दल विनंती करण्यात आली होती परंतु कोणत्याही पक्षाने ओबीसींची बाजू ऐकून घेतली नाही शिवाय एवढी मोठी ताकत असूनही आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे भाजपा-महायुतीला पाठिंबा देण्याचा ठराव अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाने केला.
या ओबीसी मेळाव्यामध्ये ओबीसी जातीनिहाय जनगणना, जिल्हास्तरीय ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व त्यांच्या शिष्यवृत्ती या वेळेत जमा कराव्यात,ओबीसी महामंडळातून युवा व महिला यांच्यासाठी वेगळ्या कोट्यातून रोजगार निर्मिती करावी , महाराष्ट्रात एक ओबीसी भवन उभारणी करावी जेणे करुन आमचा पूर्ण समाज एकच छताखालीउभा राहील , आमच्या आरक्षणात कोणाचाही वाटा देऊ नये ,ओबीसी समाजातील कलावंतांसाठी सन्मान व मानधन चालू करावे, अशा विविध मागण्या भाजपा-महायुतीला निवडणूक प्रचारासाठी करण्यात आल्या आहेत.या मेळाव्यामध्ये विधानसभेत प्रचार यंत्रणा राबविण्याची चर्चा झाली.