*पुणे: *:- सिंबायोसिस संस्थचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या वतीने आज मंगळवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिन व संग्रहालयाचा २८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना, संस्थेच्या मानद संचालिका, सौ. संजीवनी मुजुमदार म्हणाल्या कि, संविधान दिन साजरा करणे हे प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करण्यासाठी आणि घटनात्मक मूल्ये, अधिकार आणि कर्तव्य यांच्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आहे. भारतीय संविधानाने भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून प्रस्थापित केले आणि नागरिकांना न्याय, स्वात्यंत्र, समता आणि बंधुत्वाची हमी दिली. अश्या प्रकारे हा दिवस राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व अधोरेखित करतो.
सिंबायोसिस च्या संग्रहालयात बाबासाहेबांनी घटनेचे लेखन ज्या टेबल आणि खुर्चीवर बसून केले ती जतन केलेली आहे. तसेच ज्या खुर्चीवर बसून बाबासाहेबांनी घटना डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्त केली तीही या संग्रहालयात जतन केलेली आहे. घटनेच्या पहिल्या १०० प्रतींपैकी एक असली घटनेची प्रत देखील येथे पाहायला मिळते ज्यावर तत्कालीन सदस्यांच्या सह्या आहेत.
आज या घटनादिनी संस्थेच्या सभागृहात सिंबायोसिस स्किल आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, किवळे येथील विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. अजय चौधरी, अध्यक्ष प्राध्यापक, डॉ. आंबेडकर चेअर, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांनी घटनेचे प्रास्ताविक वाचले व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी देखील त्याचे सामूहिक वाचन केले. हेमांगी कडलक यांनी आभार प्रदर्शन केले.