“सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या स्नेहाच्या दाभेकर पॅटर्न चे सर्वांनी अनुकरण करावे” – सदानंद मोरे

Spread the love

 

“शासकीय अनुदान न घेता सेवाकार्य करणाऱ्यांना दानशूरांनी मदत करावी” – संदीप खर्डेकर.

बाळासाहेब दाभेकर हे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एकत्र आणणारे व त्यांच्यात स्नेहभाव निर्माण करणारे व्यक्तिमत्व असून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच नव्हे तर रोजच त्यांच्याकडे येऊन बसणाऱ्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एक वेगळे आणि अनुकरणीय उदाहरण प्रस्तुत केले आहे असे गौरवोदगार ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी काढले. ह्या दाभेकर पॅटर्न चे सर्वांनी अनुकरण करावे आणि विशेषतः राज्यातील नेत्यांना तर हे करणे गरजेचेच आहे असेही ते म्हणाले.
आमदार हेमंत रासने यांनी बाळासाहेब दाभेकरांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करतानाच कोणताही पक्षभेद न ठेवता सर्वांना मदत करण्याचा दाभेकरांचा स्वभाव असून त्यामुळेच एवढा मोठा मित्र परिवार त्यांच्या भोवती आहे, त्यांना दीर्घायुष्य मिळो अशी मी प्रार्थना करतो असेही हेमंतभाऊ म्हणाले.
यावेळी बाळासाहेब दाभेकर यांचा पगडी, वीणा व तुळशीमाळाने सत्कार करण्यात आला.या सत्कारामागची कल्पना ही बाळासाहेब दाभेकर यांच्या निस्पृह सामाजिक कार्याचा गौरव व्हावा या हेतूने असल्याचे दत्ताभाऊ सागरे आणि संदीप खर्डेकर म्हणाले. कोणतीही प्रसिद्धी न करता किंबहुना बहुतांश वेळा फोटोत सुद्धा न येता समाजसेवा करण्याचे बाळासाहेबांचे दातृत्व आहे असे संदीप खर्डेकर म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने याप्रसंगी वडगाव बुद्रुक च्या नवरत्न वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी डायपर भेट देण्यात आले.
नावाजलेल्या संस्थांना मोठ्या प्रमाणावर मदत मिळते मात्र अनेक संस्था ह्या शासकीय अनुदानाविना ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अनाथ मुलं व वंचितांसाठी काम करतात, समाजातील दानशूरांनी अश्या संस्थांना मदत करण्याची गरज असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
नवरत्न वृद्धाश्रम च्या अनिता रोकडे, शांतिबन वृद्धाश्रम च्या अनिता देवकर,स्वामी आंगण डोणजे च्या अंजली जोशी, सेवाव्रत फाउंडेशन चे प्रदीप देवकुळे, उमेद फाउंडेशन चे राकेश सणस यासह अनेक सेवाभावी कार्यकर्ते आपापल्या परीने सेवाकार्य करत आहेत मात्र त्यांना पुरेशी मदत मिळत नाही व अनेकवेळा दैनंदिन खर्चाचा मेळ बसविताना तारांबळ होते असे संदीप खर्डेकर म्हणाले. अश्या संस्थांना मदत मिळवून देण्यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन तत्पर असून येथे किराणा सामान, डायपर व इतर वस्तुरूपाने मदतीसाठी 9850999995 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही संदीप खर्डेकर यांनी केले.
बाळासाहेब दाभेकर यांच्या पासष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार हेमंत रासने,भाजपा चे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, काँग्रेस चे नेते अभय छाजेड,भाजपा चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर,निरंजन दाभेकर,
दाभेकर मित्र परिवाराचे मार्गदर्शक आणि सत्कार सोहोळ्याचे संयोजक दत्ताभाऊ सागरे,प्रमोद घाडगे, राजाभाऊ पंडित, महेश वाघ,अनिल येनपुरे,नगरसेवक राजेश येनपुरे, नगरसेवक योगेश समेळ,नगरसेविका अर्चनाताई पाटील,ऍड. मंदार जोशी,तुषार पाटील व अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सत्कार सोहोळ्यानंतर “हा माझ्यासाठी भावनिक क्षण असून उर्वरित आयुष्य मी समाजसेवेसाठी वाहून घेणार असल्याचे बाळासाहेब दाभेकर म्हणाले.
सत्कार समारंभनिमित्त भरलेल्या सर्वपक्षीय स्नेह मेळाव्यात अंकुशअण्णा काकडे, दीपकभाऊ मानकर, अरविंदजी शिंदे,रुपालीताई पाटील, परशुरामजी वाडेकर, अजितदादा दरेकर व इतर अनेकांनी गप्पांचा फड रंगवत, हास्य कल्लोळात एकमेकांची खेचाखेची करत कोट्या करत पुण्याच्या राजकीय “सु” संस्कृती चे दर्शन घडविले.

संदीप खर्डेकर.
अध्यक्ष,
क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *