
पुणे : १९७५ मध्ये देशावर लादण्यात आलेल्या आणीबाणीच्या ५० व्या वर्षानिमित्त शहर भारतीय जनता पक्षाने “आणीबाणीचा काळा दिवस” या विषयावरील ज्येष्ठ संघ प्रचारक सुहासराव हिरेमठ यांचे व्याख्यान आणि सत्याग्रहात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांचा गौरव समारंभ आयोजित केला असल्याची माहिती अध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
येत्या गुरुवारी (२६ जून) सायंकाळी ६ वाजता बिबवेवाडीतील अण्णा भाऊ साठे सभागृहात कार्यक्रम होणार आहे.
घाटे म्हणाले, “कार्यक्रमाचा उद्देश २५ जून १९७५ या दिवशी काँग्रेस सरकारने लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात उभे राहिलेल्या लोकशाहीप्रेमी सत्याग्रहींना मानवंदना देणे आणि त्या काळातील वास्तवाची आठवण करून देणे असा आहे. आणीबाणीच्या काळात न्यायसंस्था, प्रसारमाध्यमे आणि सर्वसामान्य जनतेवर घातलेले निर्बंध, यामुळे लोकशाही मूल्यांची पायमल्ली झाल्याचे या व्याख्यानातून अधोरेखित होणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे लोकशाहीच्या लढ्यातील योगदानाची आठवण करून देणारा आणि नव्या पिढीला त्या इतिहासाशी जोडणारा प्रयत्न आहे.”