कोथरुड मधील मिसाबंदींकडून आणीबाणीच्या संघर्षमय आठवणींना उजाळा

Spread the love

 

आणीबाणी लागू करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची हत्या केली- माजी मंत्री प्रकाश जावडेकर

भाजपा कोथरूड मध्य मंडलच्या वतीने आणीबाणीतील बंदींचा विशेष सन्मान

स्वतः ची खुर्ची वाचविण्यासाठी देशात आणीबाणी लागू करुन, निरपराध लोकांना तुरुंगात डांबणे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय राज्यघटनेची हत्या होती, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली. तसेच, स्वातंत्र्य आणि राज्य घटनेची पुनर्स्थापना करण्यासाठी करावा लागलेला संघर्ष तरुण पिढी पर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याची भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भारतीय जनता पक्ष कोथरूड मध्य मंडलच्या वतीने आणीबाणी काळा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करुन, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, कार्यक्रमाचे आयोजक भाजपा मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, जगन्नाथ कुलकर्णी यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा देताना माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, आपल्या देशाला १५० वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रुपाने वैभव आपल्या देशाला बहाल केलं. पण स्वतःच्या खूर्चीसाठी कॉंग्रेसने हे वैभव उद्ध्वस्त करुन, देशात आणीबाणी लागू करुन; अनेकांना तुरुंगात डांबलं. या बंदी काळात अनेकांनी प्रचंड हालअपेष्टा सोसल्या. अनेक गरोदर महिलांना देखील तुरुंगात डांबण्याचं काम तत्कालीन सरकारने केलं होतं. त्यांची प्रसूती देखील तुरुंगातच व्हायची, पण कोणीही हार मानली नाही, अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.

ते पुढे म्हणाले की, आणीबाणी आणि मिसाबंदी हे दोन्ही काळ अतिशय संघर्षाचे होते. मिसाबंदींना अनिश्चित काळासाठी तुरुंगवास भोगावा लागला. त्यामुळे हा संघर्ष काय होता. स्वातंत्र्यासाठी आणि संविधानाच्या पुनर्स्थापनेसाठीचा संघर्ष नव्या पिढीला माहिती असणं आवश्यक आहे.‌ आज कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी खिशात एक पुस्तक घेऊन फिरत आहेत. मात्र ते पुस्तक कोरं आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच, संघ स्वयंसेवकांच्या जिद्द आणि चिकाटी मुळे देशात पुन्हा संविधानाची पुनर्स्थापना झाली, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगलेले मधुसूदन पारखे म्हणाले की, आणीबाणी मध्ये कारागृहात असलेल्या कुणाच्याही मनात खंत नव्हती, उटल तुरुंगवासाच्या काळात सामाजिक कामासाठी नवी ऊर्जा मिळत होती. या कालखंडात असंख्य लोकांनी आपल्या आयुष्याची समिधाच अर्पण केली होती. आज जे लोक संविधान म्हणून ओरडत आहेत, त्यांनी देशात आणीबाणी लागू करण्यासाठी राज्य घटनेची मोड केली, त्यावरही आपली भूमिका मांडावी. सज्जन शक्तीच्या संघर्षाचा इतिहास साक्षीदार आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या हिरामण जगताप, श्रीराम तथा आप्पा कुलकर्णी, संभाजी ढवरे, अशोकराव नाफडे, श्रीनिवास तेलंग, अनिल रहाळकर, सुभाष काकडे, विजयराव हर्षे, अविनाश देव, कृष्णाजी भडाळे, आनंद करमरकर, विनायक खेडकर, चंद्रशेखर घाटपांडे, प्रा. रघुनाथ काकडे, सोपान चव्हाण, संजयराव रबडे, रवी रबडे, अरविंद शिराळकर, जीना कलगीकर, मोहन थिटे, राजेंद्र कानेटकर, प्रा. अनिल कुलकर्णी, रविंद्र घाटपांडे, शामसुंदर जोशी, विश्वास रथकंटीकर, दिलीपराव नगरकर, विश्वासराव हर्षे, सरमुकादम, अशोक प्रभूणे, मधुसूदन पारखी, जगदिश साठे, मोहनराव पंडित, कुमारजी आठवले, शैला सोमण-पाठक, रंजना शितोळे, मंगला वझे- क्षीरसागर, अमला फडके- वैद्य, प्रज्ञा धारप, श्रीमती मीना भेलके यांचा विशेष सन्मान माजी केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *