Spread the love

कसबा गणपती मंदिराच्या पहिल्या मजल्याच्या जतन व संवर्धनासाठी ₹४० लाखांचा निधी

आमदार रासने यांच्या पाठपुराव्याला यश

कसबा गणपती मंदिर हे मंदिर आपल्या परंपरेचं प्रतीक – आ. हेमंत रासने

पुणे – पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून पुण्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि श्रद्धेचा भाग आहे. या मंदिराच्या पहिल्या मजल्याच्या जतन व संवर्धनासाठी आता जिल्हा नियोजन निधीतून ₹४० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून,या कामाचा शुभारंभ आज मंदिर परिसरात आमदार हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. आमदार हेमंत रासने यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला हे यश आले आहे.
या प्रसंगी बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, “गणेश मंडळातील कार्यकर्ता म्हणून सुरू झालेला माझा प्रवास नागरिकांच्या प्रेमामुळे आमदारपदापर्यंत पोहोचला. श्री कसबा गणपती मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मानाचा गणपती मानलं जात असून, हे मंदिर आपल्या परंपरेचं प्रतीक आहे. त्याच्या पहिल्या मजल्याच्या जतन व संवर्धनासाठी निधी मिळवणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. या निधीमुळे मंदिराच्या पहिल्या मजल्याचे ऐतिहासिक मूल्य जपत सुरक्षित जतन आणि देखभाल होणार असून, हे काम पुण्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशासाठी मोलाचे ठरणार आहे.”

आमदार हेमंत रासने म्हणाले, या कामा सोबत आपण कसबा विधानसभा मतदारसंघ स्वच्छ आणि सुंदर करण्याचा तसेच फ्लेक्स मुक्त कसबा करण्याचा संकल्प केला आहे. हे सर्वांच्या सहकार्याने शक्य होणार असून भविष्यात कसबा मतदारसंघाचा कायापालट झालेला निश्चितपणे दिसेल.

या कार्यक्रमाला कसबा गणपती ट्रस्ट अध्यक्ष विनायक ठकार, विश्वस्त सौ. संगीता ठकार, चतुर्थी कसबा गणपती मंडळ अध्यक्ष श्रीरंग होनप, सुनील पारखी, सुहास कुलकर्णी, अमित कंक, छगन बुलाखे, प्रशांत सुर्वे, माजी नगरसेवक आणि अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.