
मोक्का व खुनाच्या प्रयत्नात फरार असलेल्या दोन गुन्हेगारांना खडकी पोलिसांची फिल्मी पाठलागातून धडाकेबाज अटक
पुणे शहरातील खडकी पोलीस ठाण्यात दाखल गु.र.क्र. 44/2025 मध्ये खुनाचा प्रयत्न व मोक्का अंतर्गत गंभीर गुन्ह्यांमध्ये दोन आरोपी मागील सहा महिन्यांपासून फरार होते. आरोपींची नावे राजेश उर्फ दाद्या नवनाथ घायाळ (रा. दादा कॉम्प्लेक्स, डॉल्फिन चौक, अपर बिबवेवाडी) आणि करण उर्फ कऱ्या सुरेश जाधव (रा. पड्याळ वस्ती, बोपोडी, पुणे) अशी आहेत.
या फरार आरोपींचा तपास करण्याचे आदेश मा. सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे (सो.) यांनी खडकी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे (सो.) व निरीक्षक (गुन्हे) दत्तात्रय बागवे यांनी पथकाची बैठक घेऊन तपासाच्या दिशा आखल्या.
तपासकार्य दरम्यान पो.उ.नि. चौगले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अनिकेत भोसले यांनी अत्यंत मेहनत व तांत्रिक कौशल्य वापरून आरोपींचे अद्ययावत मोबाईल क्रमांक मिळवले. त्यानंतर त्यांच्या दैनंदिन हालचालींचा सखोल अभ्यास केला गेला. आरोपींनी अनेकदा ठिकाणं बदलून पोलीस यंत्रणेला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला होता.
शेवटी एका महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पो.अं. आबा केदारी, सुधाकर राठोड, व ऋषिकेश दिघे यांच्या मदतीने एक नियोजित सापळा रचण्यात आला. मात्र आरोपींनी पोलीसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पलायन केले. तरीही पोलिसांनी हार न मानता, अतिशय शिताफीने आणि धाडसाने सुमारे दीड ते दोन किलोमीटरचा पाठलाग करत दोघांनाही ताब्यात घेतले.
ही संपूर्ण कारवाई ही खडकी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकासाठी गौरवास्पद असून, यात दाखवलेली दक्षता, धाडस, तांत्रिक कौशल्य आणि टीमवर्क अत्यंत कौतुकास्पद आहे. या धडाकेबाज अटकेमुळे पोलिसांची कार्यक्षमता आणि गुन्हेगारीविरुद्धची निष्ठा अधोरेखित झाली आहे.