
पुणे, – महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही चाकण फेज-२ अतिउच्चदाब केंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाल्याने गेल्या चार दिवसांपासून चाकण औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांचा व परिसरातील गावांचा वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने सुरु होता. महावितरण व महापारेषण या दोन्ही कंपन्यांनी युद्धपातळीवर काम करुन मंगळवारी (दि. २९) दुपारी १२.१९ वाजता बिघाड दुरुस्त करत वीजपुरवठा पुर्ववत करण्यात यश मिळविले आहे.
चाकण फेज-२ अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात महापारेषण कंपनीचे ५० एमव्हीए क्षमतेचे दोन अतिउच्चदाब रोहित्रे आहेत. पैकी एकामध्ये २१ तारखेला बिघाड झाला. चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांना रविवारची सुटी असल्याने विजेची मागणी कमी असते. त्यामुळे २६ तारखेला दुपारी ४ वाजता नादुरुस्त रोहित्र बदल्याचे काम पारेषण कंपनीने हाती घेतले. २८ तारखेला सकाळी ९.३५ वाजता काम पूर्ण करुन वीजपुरवठा सुरु करण्यात आला. तो दिवसभर चालला. मात्र सायंकाळी त्याच रोहित्रात पुन्हा बिघाड झाला. भरपावसात पुन्हा बिघाड दुरुस्ती करण्यात आली. शेवटी मंगळवारी (२९ जुलै) दुपारी १२.१९ वाजता उच्चदाब रोहित्र पूर्ण क्षमतेने कार्यन्वित करण्यात यश आले.
महापारेषणच्या बिघाड दुरुस्ती काळात संबंधित रोहित्रावर असलेला ४० मेगावॅटचा भार दुसऱ्या रोहित्रावर वळवून चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात आला. या संपूर्ण काळात उच्चदाबाचे १९० व लघुदाबाचे ११०० औद्योगिक ग्राहक तर वराळे, भांबोळी, सावरदरा, शिंदे, वासोली व सांगुर्डी आदी गावांमधील अंदाजे ६५०० वीजग्राहकांना याची झळ बसली. महावितरणने गावांना रात्री तर उद्योगांना दिवसा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला. उच्चदाब औद्योगिक ग्राहकांमध्ये टाटा टॅको, जीई, पॅकटाईम, इमरसन, इमीटेक, इस्सार, प्लास्टिक ओम्नीअम, बजाज इलेक्ट्रिक आदी ग्राहकांचा समावेश होता.
महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोलप, अधीक्षक अभियंता युवराज जरग (महावितरण) व विठ्ठल भुजबळ (महापारेषण), महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके, उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेळके, सहा. अभियंता विक्रांत वरुडे यांनी युद्धपातळीवर यंत्रणा कामाला लावून बिघाड दुरुस्तीचे व वीजपुरवठ्याचे नियोजन केले.