
पुणे :सर्वोच्च न्यायालयाच्या सुधारित आदेशानुसार भटक्या व आक्रमक श्वानांवर कारवाई करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी *क्रिएटिव्ह फाउंडेशन*चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त मा. नवलकिशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की —
रात्रीच्या वेळी झुंडीने फिरणाऱ्या व दुचाकीस्वारांवर तसेच पहाटे फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला करणाऱ्या भटक्या श्वानांवर तातडीने कारवाई करावी.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, दररोज सरासरी 80 नागरिकांना श्वानदंशाचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा श्वानांना पकडून कोंडवाड्यात ठेवण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
प्राणीप्रेमाच्या नावाखाली रस्त्यावर श्वानांना खाऊ घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच अशा व्यक्तींना भटकी कुत्री देऊन त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी सोपवावी.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, शहरातील ठराविक जागांवरच श्वानांना खाऊ घालण्याची मुभा द्यावी, मात्र सामान्यांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
श्वानांच्या नसबंदीची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होणे आवश्यक असून, संबंधित संस्थेने दरमहा आकडेवारी जाहीर करावी. तसेच नसबंदी झालेल्या श्वानांच्या गळ्यात ठळक ओळख पट्टी (लाल वा इतर रंगाची) लावणे बंधनकारक करावे.
खर्डेकर यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, *“आता ठरविण्याची वेळ आली आहे की मनुष्यजीव महत्त्वाचा की श्वानप्रेम? सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार राज्य शासनाने भटक्या, रेबीज झालेल्या व आक्रमक श्वानांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची सविस्तर आकडेवारी सादर करावी,”* अशी आमची आग्रही मागणी आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रश्नावर महापालिका व राज्य शासन काय ठोस भूमिका घेते याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.