
कै. धोंडिबा सुतार बस स्थानकावर महिला स्वच्छतागृह मनपाचे असले तरी कुलूपबंद – महिलांना होतोय प्रचंड त्रास
मनपाचे स्वच्छतागृह प्रवाश्यांसाठी की दुकानदारांच्या खासगी वापरासाठी?
पुणे : कै. धोंडिबा सुतार बस स्थानकावर महिलांसाठी उभारलेले पुणे मनपाचे स्वच्छतागृह हे फक्त फलकापुरते मर्यादित राहिले आहे. प्रत्यक्षात हे स्वच्छतागृह कायम कुलूपबंद असते आणि धक्कादायक बाब म्हणजे त्याची चावी शेजारील दुकानदाराकडे ठेवण्यात आली आहे. महिला प्रवाश्यांनी तक्रार करताना संताप व्यक्त केला की, “मनपाचे स्वच्छतागृह असताना आम्हाला दुकानदारांकडे भिक मागावी लागते. एवढा अपमान आम्ही किती काळ सहन करायचा?”
एवढेच नव्हे तर येथे पुरुषांसाठी असलेले शौचालयदेखील कायम बंद असल्याचे समोर आले असून, संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.प्रवाशांचा संताप व्यक्त होत असून, *“सुविधा असूनही आम्हाला वापरता येत नाही, आणि सभोवताली दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे उभे राहणेही कठीण झाले आहे. मनपाने सुविधा विकल्या आहेत काय?”* असा जळजळीत सवाल नागरिक करत आहेत.
दुकानदाराकडे विचारणा केली असता बिनधास्त उत्तर मिळते – “हे स्वच्छतागृह आमच्यासाठी आहे!” मग प्रश्न असा – *मनपाने बांधलेले स्वच्छतागृह प्रवाश्यांसाठी की दुकानदारांसाठी?*
दररोज शेकडो महिला प्रवासी या बस स्थानकावरून प्रवास करतात. पण तातडीच्या गरजेच्या वेळी त्यांना अमानवीय परिस्थितीला सामोरे जावे लागते. महापालिकेच्या “स्वच्छ भारत” अभियानाचे फलक लावून मनपा प्रशासन कर्तव्यपूर्ती करत असले तरी प्रत्यक्षात महिलांचा प्रश्न दुर्लक्षित आहे.
👉 स्थानिक महिलांचा संताप:
“मनपा लाखो रुपये खर्चून स्वच्छतागृह उभारते आणि त्यावर काही दुकानदारांचा ताबा ठेवते, हे लाजिरवाणे आहे. मनपाच्या निष्क्रियतेमुळे महिलांची रोजची पिळवणूक सुरू आहे!”
परिसरातील नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांना जाब विचारला असून, तातडीने हे स्वच्छतागृह महिलांसाठी खुले करावे, दुकानदारांचा अडसर दूर करावा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी ठाम मागणी होत आहे.