प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

Spread the love

वाजत-गाजत निघणार बाप्पाची मिरवणूक

पुणे : प्रतिनिधी – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २७) दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या मुहूर्तावर होणार आहे. त्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक देखील निघणार आहे.

मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘गणेश चतुर्थीला सकाळी बाप्पाची आरती होईल. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता प्रत्यक्ष मिरवणुकीला सुरवात होईल. सुरवातीला लाठीकाठी हा मर्दानी खेळ आणि केशव शंखनाद होईल. त्यानंतर ७ पथकांकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनासमोर ढोल-ताशांची सलामी दिली जाणार आहे. श्रीराम पथक, कलावंत, वाद्यवृंद, विश्वगर्जना, स्वयंभूगर्जना, गजर, नूमवि ही सात ढोल ताशा पथके बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. या सर्व पथकांच्या वादन मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाचे वाजत गाजत आगमन होणार आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही बाप्पाच्या रथाला बैलजोडी न लावता मंडळाचे कार्यकर्ते हा रथ ओढणार आहेत. दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या मुहर्तावर प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.’’ प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पुढील कार्यक्रम होणार असल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले.
—————

‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची दरवर्षीप्रमाणे यंदाही वाजत-गाजत मिरवणुकीनंतर प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मागील वर्षी त्यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी भेट दिली असता त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार यंदा हा मान त्यांना देण्यात आला आहे. गणपती बाप्पाचे सेवेकरी म्हणून आमच्या सर्वांसाठीच ही गोष्ट अत्यंत आनंद देणारी आहे.
– पुनीत बालन
*(उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *