जिओ स्टुडिओजच्या ‘बाईपण भारी देवा’ची 24 दिवसांत 65.61 कोटींची भरारी!*

पुणे:- जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास 24 दिवस झाले आहेत तरीदेखील प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही थिएटर्समध्ये महिलांचे ग्रुप्स मोठ्या संख्येनं एकत्रित चित्रपट पाहण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शना आधीच प्रेक्षकांमध्ये ‘बाईपण भारी देवा’ विषयी उत्सुकता पहायला मिळाली होती, बॉक्सऑफिसवर हा चित्रपट कमाल करेल अशी चर्चाही रंगली होती. आणि ह्याच अपेक्षेवर खरं उतरत ह्या चित्रपटान केवळ 24 दिवसांत केलेली 65.61 कोटींची कमाई केली आहे. आणि हे चित्र पाहता हया चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला आलेली मरगळ झटकून फेकून दिलीय अशी चर्चा रंगलेली दिसत आहे. नुकतीच या चित्रपटाची सक्सेस पार्टी मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडली. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित होती.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 12.50 कोटींचा गल्ला जमवला होता, दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटानं बॉक्सऑफिसवर आपली हुकमत कायम ठेवत 24.85 कोटींची कमाई केली, त्याच प्रमाणे तिसऱ्या तिसऱ्या आठवड्यात ही बाजी मारत 21.24 कोटींची कमाई केली आहे. आणि आतापर्यंत फक्त 24 दिवसांत ह्या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर एकूण 65.61 कोटींचा पल्ला गाठला आहे. प्रदर्शनानंतर ‘बाईपण भारी देवा’नं नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत आणि सिनेमागृहात ओसांडून वाहणारी प्रेक्षकांची गर्दी बघता ही आकडेवारी अजून मोठी झेप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला ‘बाईपण भारी देवा’ची संपूर्ण कलाकरांची टीम, तसंच दिग्दर्शक केदार शिंदे, निर्माती माधुरी भोसले, सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे अशी संपूर्ण टीम उपस्थित होती. तसंच या सक्सेस पार्टीत अभिनेत्री सुकन्या मोने यांचे पती अभिनेते संजय मोने, वंदना गुप्ते यांचे पती शिराष गुप्ते, दीपा परब हिचे पती अभिनेता अंकुश चौधरी, रोहिणी हट्टंगडी यांचा मुलगा असिम आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर यांची विशेष उपस्थिती सर्वांनाच सरप्राईज देणारी ठरली.

”आपल्या चित्रपटाच्या यशाचं सगळं क्रेडिट त्यातील अभिनेत्री आणि त्यासाठी सर्वतोपरे मेहनत घेणाऱ्या माझ्या टीमचं आहे”, अशी भावना दिग्दर्शक केदार शिंदे यांनी व्यक्त केली. चित्रपटाची लेखिका वैशाली नायक हिचे विशेष आभार मानत केदार शिंदे यांनी तिच्या लिखाणाचं कौतूकही केलं. त्याचबरोबर या प्रसंगी सर्व तंत्रज्ञ, गायक, संगीत दिग्दर्शक यासगळ्यांची विशेष ओळख करून देण्यात आली.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि स्वतः जिओ स्टुडिओनं केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे हे आहेत. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट आहे. आणि आजही चित्रपटाचे कलाकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी थिएटर्समध्ये जाऊन प्रेक्षकांची भेट घेताना दिसत आहेत.