सायनस शस्त्रक्रिया कार्यशाळेचे आयोजन

पुणे : भारती हॉस्पिटल कान, नाक, घसा विभाग, डोके व मान शस्त्रक्रिया विभाग, शरीरशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय सायनस शस्त्रक्रिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा उद्देश्य पदव्युत्तर आणि तरुण ईएनटी शल्यचिकित्सकांना सायनस शस्त्रक्रियेच्या मूलभूत गोष्टींमध्ये प्रशिक्षण देणे हा होता. प्रख्यात शल्यचिकित्सकांची व्याख्याने, थेट शस्त्रक्रिया प्रात्यक्षिक आणि शव विच्छेदन यांचा यामध्ये समावेश होता. यावेळी मुंबईस्थित वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. निशित शहा म्हणाले, अशी कार्यशाळा ही काळाची गरज आहे. त्यामुळे तरुण सर्जनला त्यांचे कौशल्य सुधारण्यास मदत होते. गाझियाबाद येथील लेफ्टनंट कर्नल डॉ रवी रॉय, केईएम हॉस्पिटल पुणेच्या कॉक्लियर इम्प्लांट आणि एंडोस्कोपिक सायनस सर्जन डॉ नीलम वैद्य, भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी, विभागप्रमुख डॉ (मेजर) प्रसून मिश्रा हे यावेळी उपस्थित होते.

डॉ ललवाणी म्हणाले, अनुभवात्मक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यात अशा अनेक कार्यशाळा सर्व विभागांमध्ये आयोजित करू. डॉ. मिश्रा म्हणाले, वैद्यक क्षेत्रातील जलद प्रगतीमुळे सर्व स्तरावरील शल्यचिकित्सकांनी अशा थेट प्रात्यक्षिकांमधून आणि अनुभवांद्वारे त्यांचे शस्त्रक्रिया कौशल्य सतत सुधारणे अत्यंत आवश्यक आहे. या कार्यशाळेसाठी देशभरातील ५० हून अधिक डॉक्टर्स उपस्थित होते. प्रतिनिधींना सायनस शस्त्रक्रियेशी संबंधित सर्व गोष्टींबद्दल अद्ययावत ज्ञान मिळाले आणि एन्डोस्कोपिक सायनस शस्त्रक्रियेच्या क्षेत्रातील दिग्गज प्राध्यापकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.