अनैतिक संबंधातुन खडकीत तरुणाचा खून, 24 तासात आरोपी अटक

पुणे : खडकी परिसरातील मुळा नदीपात्रात एका तरुणाचा खून करुन त्याची ओळख पटू नये व पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळून टाकण्याची घटना घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी आरोपीला 24 तासात धानोरी येथून अटक केली आहे. मृतदेह नवीन खडकी ब्रीजच्या खाली मुळा नदीच्या पात्रातील जलपर्णी मध्ये रविवारी (दि.17) दुपारी अडीच वाजता आढळून होता.

विजय राजू धोत्रे (वय-33, रा. बॉम्बे सॅपर्सजवळ, येरवडा, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुधीर साहेबराव जाधव (वय 32, रा. विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार शशांक सुरेश डोंगरे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. (Pune Murder News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी खडकी परिसरातील मुळा नदीपात्रात एकाचा मृतदेह सापडला. मृतदेह जळालेल्या अवस्थेत नदीच्या पात्रात जलपर्णीमध्ये आढळून आला. घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. या ठिकाणी एक चिठ्ठी आढळून आली. तसेच मृत तरुणाच्या कपड्यांच्या तुकड्यांच्या आधारे तरुणाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी खडकी, चतुश्रृंगी, येरवडा व विश्रांतवाडी या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच खडकी परिसरातील हॉटेल, शॉप व दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. सीसीटीव्ही व मिळालेल्या चिठ्ठीच्या आधारे मयत तरुणाचा खडकी, विश्रांतवाडी, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोध घेण्यात आला. मृत तरुण येरवडा परिसरातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला. नातेवाइकांना भेटल्यानंतर मृत तरुणाच्या पायाला झालेल्या जुन्या जखमेवरून त्याची ओळख पटली. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी सुधीर जाधव याला धानोरी परिसरातून ताब्यात घेतले. आरोपी व त्याच्या साथीदारांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन व अनैतिक संबंधातून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग आरती बनसोडे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम भजनावळे,
सहायक पोलीस निरीक्षक सहास पाटील, सहायक पोलीस निरीक्षक किरण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक आण्णा गुंजाळ,
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले, तानाजी कांबळे, पोलीस अंमलदार कलंदर, निकाळजे, अतुल इंगळे,
अनिकेत भोसले, ऋषिकेश दिघे यांच्या पथकाने केली.