टीजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर येथे एआय-तंत्रज्ञानाचा वापर करून फुफ्फुस आणि प्रोस्टेट कर्करोगाने पिडीत रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार

महाराष्ट्रात प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर करुन कर्करोगावर केली मात

पुणे, : टीजीएच- ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरने फुफ्फुसाचा कर्करोग असलेले ७० वर्षीय रुग्ण (पुरुष) आणि प्रोस्टेट कर्करोगाने पिडीत ६२ वर्षीय पुरुष रुग्णावर एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन यशस्वी उपचार केले. महाराष्ट्रात कॅन्सरच्या अचूक उपचारासाठी प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजेंन्सवर आधारीत सिंक्रोनी ऑटोमॅटिक, रिअल-टाइम मोशन सिंक्रोनाइझेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन यशस्वी उपचार करण्यात आला आहे. एआय-आधारित रेडीएशन उपचार पद्धतीचा अवलंब करून, दोन्ही रुग्णांनी कर्करोगावर यशस्वी मात केली आहे. आज पत्रकार परीषदेदरम्यान याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली याप्रसंगी डॉ. अभिषेक पुरकायस्थ, डाँ.ज्योती मेहता, सचिन देशमुख, कार्यकारी संचालक, डाँ.संतोष साहू आणि रूग्ण अनंतराव राईकर उपस्थित होते.

७० वर्षीय रुग्ण श्री अनंतराव रायकर, तळेगाव, पुणे येथील रहिवासी, ज्यांना दैनंदिन कामात श्वासोच्छवासाचा त्रास होत होता, त्यांनी अनेक तज्ञांची मदत घेतली, परंतु त्यांना यश आले नाही. सुरुवातीला, सीटी स्कॅन आणि नंतर संपूर्ण शरीराचे पेट स्कॅन केले गेले ज्यामध्ये त्यांच्या डाव्या बाजूच्या फुफ्फुसात कर्करोगजन्य गाठ आढळून आली. बायोप्सीने फुफ्फुसाच्या कार्सिनोमाच्या निदान झाले. त्यांच्यावर सुरूवातीला पँलेटीव्ह केमोथेरपी आणि त्यानंतर टार्गेटेड थेरपीने उपचार करण्यात आला पंरतू पुन्हा केलेल्या पेट स्कँनमध्ये आजार लिम्फ नोडमध्ये प्रगत अवस्थेत असल्याचे दिसून आले आणि त्यामुळे रूग्णाला अधिक त्रास जाणवू लागला.

दुसऱ्या प्रकरणात सोलापूर येथील ६२ वर्षीय पुरुषाला मागील एका महिन्यापासून मूत्रमार्गासंबंधीत समस्या उद्भवू लागल्या होत्या. तज्ज्ञांनी केलेल्या तपासणीअंती रुग्णाला प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले. प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग हा भारतातील प्रमुख दहा कर्करोगांपैकी एक आहे. हा कर्करोगाचा प्रकार सहसा ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये आढळून येतो परंतू अलीकडे ३५ ते ४४ आणि ५५ ते ६४ वयोगटातील तरुण पुरुषांमध्येही या कर्करोगाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

डॉ. अभिषेक पुरकायस्थ( सल्लागार, टोमोथेरपी आणि रेडिएशन ऑन्कोलॉजी विभाग, टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर) सागंतात की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित सिंक्रोनी ऑटोमॅटिक, रीअल-टाइम मोशन सिंक्रोनाइझेशन तंत्रज्ञान असलेली आधुनिक प्रणाली उपचारांसाठी एक अचूक आणि सुरक्षित पर्याय ठरत आहे. फुफ्फुस, यकृत, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि प्रोस्टेट कर्करोग यासारख्या विविध कर्करोगावर या माध्यमातून यशस्वी उपचार करणे शक्य आहे. या एआय सिस्टमच्या एका बाजूला एक्स-रे पॅनल आणि दुसऱ्या बाजूला डिटेक्टर आहे. ही प्रणाली रेडिओथेरपीचा अविभाज्य भाग आहे आणि सिंक्रोनी रेस्पिरेटरी कॅमेराच्या मदतीने ट्यूमरचे स्थान रिअल-टाइममध्ये ट्रॅक करता येते. दैनंदिन सेटअप प्रक्रियेवर अवलंबून असलेले उपचार १० ते १५ मिनिटांत केले जातात. एआय-आधारित सिंक्रोनी सिस्टम रेडिएशन थेरपी सत्रादरम्यान रिअल-टाइम ट्रॅकिंग सक्षम करते, ज्यामुळे आसपासच्या निरोगी पेशींचे नुकसान अतिशय कमी प्रमाणात होते. ही नवीन उपचारप्रणाली कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करण्यात अचूक कामगिरी बजावते. ट्यूमरनुसार रेडिएशन बीम समायोजित करून हे तंत्र रुग्णाच्या नैसर्गिक श्वासोच्छवासासह कार्य करते. रुग्ण अनंतरावरायकर यांना श्वास रोखून धरण्याची गरज न पडता सामान्य श्वासोच्छवासावर उपचार केले गेले.

रुग्णाने कार्डियाक ऍरिथमिया, न्यूमोनिटिस आणि छातीच्या बरगड्यांमधील वेदना यासारखे कोणतेही तीव्र परिणाम न अनुभवता उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. सध्या रुग्ण नियमित फॉलोअप घेत असून वैद्यकीयदृष्ट्या त्याची प्रकृती स्थिरावली आहे. रुग्णास तंबाखूजन्य पदार्थ, धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या कोणत्याही आरोग्यास घातक असणा-या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रुग्णाला उच्च प्रथिनयुक्त आहार घेणे आणि कोणत्याही प्रकारचा अनावश्यक ताण न घेता दैनंदिन काम सुरु ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रुग्णावर योग्य वेळी उपचार न केल्यास कर्करोगाचा प्रसार संपूर्ण शरीरात होऊ शकतो आणि त्यामुळे रूग्णा बरा होऊ शकत नाही तसेच उच्च विकृती आणि मृत्यू ओढावू शकतो असेही डॉ अभिषेक पुरकायस्थ यांनी स्पष्ट केले.

एका ६२ वर्षीय रुग्णाला देखील उपचार पध्दतीचा फायदा झाला. ईमेज-गायडेड रेडिएशन थेरेपी (आयजीआरटी) हे एक अत्याधुनिक तंत्र आहे जे प्रोस्टेटची हालचाल नियंत्रित करते, जी किरणोत्सर्गासह श्वासोच्छ्वास किंवा आतड्यांच्या हालचालींसारख्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे बदलू शकते. संपूर्ण उपचार सत्रात आसपासच्या निरोगी ऊतींचे नुकसान होणार नाही याची खबरदारी बाळगण्यात आली. हा दृष्टिकोन सुरक्षित आणि अचूक उपचार आहे आणि यशस्वी परिणामांसह जलद पुनर्प्राप्तीची हमी देतो. रुग्णावर उपचाराचे कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. सिंक्रोनी-आधारित आयजीआरटी पध्दत ही प्रोस्टेट कर्करोगाविरूद्धच्या लढ्यात यशस्वी परिणामांची खात्री देते.यामध्ये उपचार प्रत्येक रुग्णाच्या गरजांनुसार तयार केले जातात, जे उपचारांचे दुष्परिणाम कमी करुन परिणामकारकता वाढवत असल्याचे, डॉ ज्योती मेहता, एमडी रेडीएशन आणि क्लिनिकल आँन्कोलाँजिस्ट यांनी स्पष्ट केले.

टीजीएच-ऑनको-लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये, कर्करोगाच्या रूग्णांना शक्य तितक्या सर्वोत्तम उपचारांचा पुरविण्यासाठी अत्याधुनिक उपचारपध्दतीचा वापर केला जातो. प्रथमच, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सिंक्रोनी सिस्टीमचा वापर करुन कर्करोगावर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. रुग्णालयाने या नवीन तंत्रज्ञानासाठी एईआरबी (AERB) कडून आवश्यक परवाना प्राप्त केला आहे. कॅन्सरच्या उपचारांमधील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत उच्च दर्जाची सेवा पुरविली जात असल्याची प्रतिक्रिया डॉ गौरव जसवाल(एमडी रेडिएशन ऑन्कोलॉजी, संचालक- रेडिएशन ऑन्कोलॉजी, ऑन्को-लाइफ हॉस्पिटल्स) यांनी व्यक्त केली.